सरपंचांच्या सह्या केल्या नसल्याचा दावा; जिंतूरचे BDO घेईना दखल:आता चौकशीचा चेंडू चक्क CEO यांच्या दालनात
लोकार्थ प्रतिनिधी गुणिरत्न वाकोडे
जिंतूर : तालुक्यातील ब्रह्मणगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी यापूर्वी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीमधील पथदिवे, दुरुस्तीची कामे, आरओ प्लांट, जलजीवन मिशन, पंधरावा वित्त आयोगाचा निधी तसेच शाळा व अंगणवाडी साहित्य खरेदी यासंदर्भात विविध अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कामांच्या कागदपत्रांबाबत सरपंचांना विचारणा केली असता, आपण संबंधित कागदपत्रांवर सह्या केल्या नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांवरील सह्यांची सत्यता तपासण्याची मागणी जोर धरत आहे.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :
ब्रह्मणगाव ग्रामपंचायतीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
पंधरावा वित्त आयोग व इतर शासकीय निधीच्या खर्चाची तपासणी करण्यात यावी.
पथदिवे, आरओ प्लांट, जलजीवन मिशन व दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी.
संबंधित कामांच्या बिलांची, व्हाउचरची व मंजुरीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी.
सरपंचांनी सह्या केल्या नसल्याचे सांगितलेल्या कागदपत्रांवरील सह्यांची अधिकृत पडताळणी करण्यात यावी.
ग्रामपंचायतीच्या मासिक सभांचे इतिवृत्त, ठराव पुस्तिका व संबंधित अभिलेख तपासण्यात यावेत.
स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी.
दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
चौकशीचा अहवाल तक्रारदाराला देण्यात यावा.
यापूर्वी तक्रार करूनही कारवाई न झाल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे ब्रह्मणगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनकर्ते दिलीप माघाडे यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.