वॉटर ग्रीड अपूर्ण, सिंचनाचे नियोजन नाही, मागील निर्णयांचा हिशोबही नाही; बंब यांच्या कार्यपद्धतीवर डोणगावकरांचा घणाघात, तर चारा छावण्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप फेटाळला
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना दुष्काळ आढावा बैठका केवळ औपचारिकता ठरत असल्याचा घणाघाती आरोप कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केला. मागील बैठकांतील निर्णयांची अंमलबजावणी नाही, वॉटर ग्रीडचे काम रखडलेले, सिंचनाच्या पाण्याचे नियोजन नाही आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांना महत्त्व दिले जात नाही, असा आरोप करत त्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या बैठकीतील कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर नाईलाजास्तव बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वॉटर ग्रीड योजनेची वर्क ऑर्डर २०२२ मध्ये देऊनही रायझिंग मेन आणि विहिरींची कामे अपूर्ण असल्याचा मुद्दा डोणगावकरांनी उपस्थित केला. जायकवाडीच्या पाण्याचा गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या उपसा सिंचन योजनेतून प्रभावी वापर करावा, नांदूर-मधमेश्वरच्या आवर्तनातून पाझर तलाव व शिवना नदीवरील कोल्हापूर बंधारे भरावेत, तसेच शेती महामंडळाच्या जमिनीवर चारा उत्पादनाचे नियोजन करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
बैठका नकोत, कामांचा हिशोब द्या!
लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन तीच अंतिम मानली जाते. मागील बैठकांतील निर्णयांचा कृती अहवाल सादर केला जात नाही. त्यामुळे बैठका घेऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होणार कशी, असा सवाल डोणगावकरांनी उपस्थित केला. दुष्काळ हा राजकारणाचा नव्हे, तर जनतेच्या जगण्याचा प्रश्न असून केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामे दिसली पाहिजेत, असेही त्यांनी ठणकावले.
बंब यांची प्रतिक्रिया : चारा छावण्यांत भ्रष्टाचार नाही
दरम्यान, कृष्णा पाटील डोणगावकर बैठकीतून बाहेर पडले, त्यावेळी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर चर्चा सुरू होती. चारा छावण्या पारदर्शकपणे इन-कॅमेरा चालविण्यात आल्या असून त्यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असा स्पष्ट दावा आमदार प्रशांत बंब यांनी केला. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नांवरून बैठकीतच लोकप्रतिनिधींमध्ये मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे.
No Comment! Be the first one.