दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली. राहुल राजपूत (वय ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल हा व्यवसायाने जिम ट्रेनर होता, तसेच त्याने वैद्यकीय शिक्षणही पूर्ण केले होते. जिमच्या माध्यमातून तो शहरातील तरुण पिढीला व्यसनमुक्त राहण्याचा आणि शरीर सुदृढ ठेवण्याचा संदेश देत असे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५००० रुपयांचे प्रोटीन देण्यास विलंब झाल्याच्या वादातून दोन अज्ञात व्यक्ती राहुलला त्याच्या घरातून बाहेर घेऊन गेल्या आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर हिंसेत होऊन हल्लेखोरांनी राहुलवर धारदार खंजीराने प्राणघातक वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काही दिवसांपूर्वीच राहुलच्या चिमुकल्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच आता घरातील कर्त्या तरुणाची हत्या झाल्याने राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “माझा भाऊ साधी सुपारीही खात नव्हता, कोणत्याही प्रकारचे व्यसन नसलेल्या तरुणाची अशी हत्या होत असेल तर शहरात कायदा-सुव्यवस्था उरली आहे का?” असा संतप्त सवाल राहुलच्या कुटुंबीयांनी विचारला आहे.
मुख्य आरोपींना आणि सूत्रधारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात घेतला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपासचक्र फिरवून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या हत्याकांडामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
No Comment! Be the first one.