३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चार दिवसांत तपासाला दिशा; चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि मोदक १०० टक्के हस्तगत
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव पिशोर
कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिरात झालेल्या चोरीचा पिशोर पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि गणपतीसमोरील चांदीचा मोदक असा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तब्बल ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, सलग चार दिवस तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
दि. २९ सप्टेंबरच्या रात्री ११ ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गणेशपूर येथील जागृत गणपती मंदिराला लक्ष्य केले. गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट आणि समोरील चांदीचा मोदक चोरून नेण्यात आला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून आरोपींपर्यंत पोहोच
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिशोर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. सलग चार दिवसांच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासात आरोपींचा शिर्डीशी संबंध निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे पथक शिर्डी येथे रवाना झाले.
दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भगवान सिंद दिलीपसिंग परदेशी, रा. शिर्डी आणि अनिल हिरालाल बेडवाल, रा. छत्रपती संभाजीनगर या दोघांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेला चांदीचा मुकुट आणि चांदीचा मोदक असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणात एकूण तीन आरोपी सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.
सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, पोलीस हवालदार दत्तात्रय मोरे, कैलास करवंदे, पोलीस नाईक फिरोज बरडे, सुनील भिवसणे, पोलीस कॉन्स्टेबल कौतिक सपकाळ, पवन खंबाट, साई घुगे, करण म्हस्के, गणेश कवाळ, सायबर गुन्हे शाखेचे योगेश तरमाळे तसेच शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहायक फौजदार इरफान शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No Comment! Be the first one.