१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान कडेकोट सुरक्षा; एसआरपीएफच्या तीन कंपन्या, आरएएफची एक कंपनी तैनात
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका, विसर्जन सोहळा, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. यामध्ये ४ पोलीस उपायुक्त (DCP), ७ सहायक पोलीस आयुक्त (ACP), ३३ पोलीस निरीक्षक (PI) आणि १०५ एपीआय/पीएसआय यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर १,५८६ पोलीस अंमलदार आणि ५०० होमगार्ड बंदोबस्तासाठी उपलब्ध राहणार आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियमित पोलीस बंदोबस्तासोबतच अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
एसआरपीएफ, आरएएफचीही मदत
गणेशोत्सवातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता एसआरपीएफच्या तीन कंपन्या आणि आरएएफची एक कंपनी देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रण, मिरवणुकीदरम्यान सुरक्षा तसेच संवेदनशील भागात तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त बळ मिळणार आहे.
गणेश मंडळांच्या मिरवणुका, प्रमुख चौक, विसर्जन मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच मिरवणुकांचे नियोजन सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडूनही विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, नियमांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No Comment! Be the first one.