वन विभागाची तत्परता; पशुवैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्तता
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव पिशोर
कन्नड तालुक्यातील घुसूर तांडा शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. पशुवैद्यकीय तपासणीनंतर पिल्लाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.घुसूर तांडा शिवारातील गट क्रमांक २३ मधील अनिल हरिदास चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत बिबट पिल्लू पडल्याची माहिती १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.५० वाजता वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचारी व वन्यजीव बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पिंजऱ्याच्या साहाय्याने पिल्लाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस पाटील आशिष चव्हाण आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात सहकार्य केले.
दरम्यान, शेतातील विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत. वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी स्वतः बचावकार्य न करता वन विभागाला तत्काळ माहिती द्यावी व सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोंपे यांनी केले.

No Comment! Be the first one.