लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, मराठवाडा अध्यक्ष दीपक डोके, जालना जिल्हाध्यक्ष डी. व्ही. डी. घुमारे, युवा अध्यक्ष विजय लहाने यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खोटारडे असून दिव्यांग, माता आणि महिलांची फसवणूक करणारे सरकार आहे,” अशी टीका त्यांनी केली. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि आर्थिक आधार मिळावा, यासाठी दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्याची मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटनेने लावून धरली आहे. या मागणीसाठी २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने दिव्यांगांच्या लढ्याला राजकीय बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, मुंबईतील आंदोलनाकडे आता दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.