लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : पुण्यात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या ३९ वर्षीय दिनेश दिलीप तेलगुते (रा. अलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) यांनी वाळूज परिसरातील पाटोदा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हे पुण्यातील केशव नगर परिसरात कुटुंबासह राहत असून वॉचमन म्हणून काम करत होते. सोमवारी ते घरच्यांना ‘दिवटीला जातो’ असे सांगून घरातून निघाले होते. मात्र, पुण्यातून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कसे आले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
शहरात आल्यानंतर नातेवाइकांकडे न जाता ते वाळूज परिसरातील पाटोदा शिवारात गेले. बजाज गेटसमोरील पाटोदा रोडवरील कार वॉशिंग सेंटरजवळील झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि पत्नी असा परिवार आहे.
No Comment! Be the first one.