धारदार शस्त्राने वार करून हत्या; रांजणी-कुंभार पिंपळगाव मार्गावरील कंडारी परतूर फाट्याजवळ मृतदेह आढळला
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे पाटील घनसावंगी
रांजणी ते कुंभार पिंपळगाव मार्गावरील कंडारी परतूर फाट्याजवळील पॉवर हाऊस परिसरात हॉटेलमालकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. नामदेव अंजीराम पाईकराव (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नामदेव पाईकराव यांचे कंडारी परतूर फाट्यावर हॉटेल आहे. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या अंगावर, पोटावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच घनसावंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी घनसावंगी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीची माहिती घेतली आहे. हत्येपूर्वी किंवा हत्येनंतर नेमके काय घडले, याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे रांजणी-कुंभार पिंपळगाव मार्गावरील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No Comment! Be the first one.