चाकूचा धाक दाखवून ९० हजारांचा मुद्देमाल लुटला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
छत्रपती संभाजीनगर- पुणे महामार्गावरील भेंडाळा शिवारात दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सोहेल आंचर काळे (वय २०, रा. गुनेरे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर; सध्या रा. अंतापूर शिवार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास अंतापूर शिवारातून त्याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे महामार्गावरील लुटमारीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
पुण्याहून परभणीकडे जाताना लुटमार
मदन दगडुबा मोरे (वय ३५, रा. देवगाव फाटा, ता. सेलू, जि. परभणी; सध्या रा. कटकेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हे २७ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून पुण्याहून परभणीकडे जात होते. यावेळी भेंडाळा शिवारातील महामार्गावर चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील २० हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल बळकावून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहितीवरून आरोपीचा शोध
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान हा गुन्हा सोहेल काळे याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री अंतापूर शिवारात कारवाई करून सोहेल काळे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणातील अन्य तीन साथीदारांचा सहभाग आणि लुटलेल्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे करीत आहेत.
No Comment! Be the first one.