बैठक केवळ कागदावरच झाल्याचा आरोप; पाणीपुरवठ्याच्या नियोजनावरून प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
जालना महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवक श्रीकांत पांगळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील नगरसेवकांसाठी बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही बैठक झालीच नसून ती केवळ कागदावरच दाखविण्यात आल्याचा आरोप नगरसेवक श्रीकांत पांगळकर यांनी केला आहे.सध्या जालना शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
शहरातील विविध प्रभागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत असताना प्रशासनाकडून ठोस नियोजन का केले जात नाही? नगरसेवकांना विश्वासात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन का केले जात नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
महानगरपालिका प्रशासनाने केवळ बैठका आयोजित केल्याचे कागदोपत्री दाखविण्यापेक्षा प्रत्यक्षात नगरसेवकांशी चर्चा करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी नगरसेवक श्रीकांत पांगळकर यांनी केली आहे.
आता महानगरपालिका प्रशासन या आरोपांची दखल घेऊन पाणीटंचाईच्या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेते, याकडे जालना शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.