जागतिक रेबीज दिनानिमित्त घनसावंगीत मोफत लसीकरण शिबिर; श्वानमालकांना नियमित लसीकरणाचे आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे पाटील घनसावंगी
रेबीजसारख्या जीवघेण्या आजारापासून माणसांचे संरक्षण करायचे असेल, तर श्वानांचे वेळेत आणि नियमित लसीकरण करणे हाच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. याच उद्देशाने जागतिक रेबीज दिनानिमित्त तालुका पशुचिकित्सालय, घनसावंगी येथे मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला श्वानमालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
डॉ. देवानंद खाडे, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, तालुका पशुचिकित्सालय, घनसावंगी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात पाळीव श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी ‘टायगर’ या श्वानाचेही लसीकरण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्वानांचे लसीकरण करून घेतले तसेच श्वानमालकांना रेबीजचा धोका, प्रतिबंधात्मक उपाय, श्वानांची आरोग्यविषयक काळजी आणि नियमित लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
रेबीज हा विषाणूजन्य आजार असून, संक्रमित प्राण्याच्या चाव्यामुळे मानवांमध्येही त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे श्वानांचे लसीकरण हे केवळ प्राण्यांच्या आरोग्याचे संरक्षण नसून, मानवी आरोग्याच्या सुरक्षेचेही महत्त्वाचे पाऊल आहे. पाळीव श्वानांचे लसीकरण वेळेत करून घेणे आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. देवानंद खाडे यांनी केले.
ग्रामीण भागात पाळीव तसेच भटक्या श्वानांचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो. त्यामुळे रेबीजबाबत जनजागृती, श्वानांची नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक लसीकरण याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. एका श्वानाचे लसीकरण म्हणजे केवळ त्या प्राण्याचे संरक्षण नव्हे, तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या कुटुंबीयांसह समाजाच्या आरोग्याचेही संरक्षण आहे, असा संदेश पशुसंवर्धन विभागाने दिला.
श्वानाने चावा घेतला? दुर्लक्ष नको!
श्वानाने चावा घेतल्यास जखम किरकोळ असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. चावलेली जखम तातडीने साबण आणि वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवावी आणि विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक प्रतिबंधात्मक उपचार पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
घनसावंगी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या पाळीव श्वानांचे नियमित रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. ‘लसीकरण करा, रेबीजपासून बचाव करा’ हा संदेश घराघरात पोहोचवून रेबीज प्रतिबंधासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले.
No Comment! Be the first one.