कन्नडमध्ये महामार्गावर नागरिकांचे ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको.
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील निष्काळजीपणा आता जीवघेणा ठरला आहे. महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे मागील काही महिन्यांत तब्बल ३२ निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून हा अपघात नसून प्रशासकीय खून असल्याचा घणाघात करत आज कन्नड येथे संतप्त नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो स्थानिक नागरिकांनी कन्नड शहर प्रवेश मार्ग, कारखाना उड्डाणपूल येथे रस्त्यावरच ठिय्या मांडला या आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, इंडियन रोड काँग्रेस (IRC) च्या नियमानुसार महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी ५०० मीटर आधीपासून ब्लिंकिंग लाईट्स, रेडियमचे फलक, बॅरिकेड्स आणि डायव्हर्शन बोर्ड लावणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदार आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या नियमांना धाब्यावर बसवले आहे.
एवढे भीषण अपघात होऊन ३२ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली नाही. तर काल रात्री झालेल्या अपघातात आणखी ४ जण गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत, तरीही सुरक्षा उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. टेंडरमध्ये सुरक्षेसाठी कोट्यवधींची तरतूद असतानाही रस्त्यावर खर्च न करता दलालीवर पैसा खर्च होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या आंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री (IPS) यांनी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
आंदोलकांनी स्पष्ट मागणी केली आहे की, हा केवळ अपघात नसून सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळे जबाबदार कंत्राटदार आणि नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून ३२ मृतांच्या कुटुंबांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
सकाळच्या आंदोलनानंतर नॅशनल हायवे अथोरिटीने एक बैठक आयोजित केली होती याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संतोष गोरड उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, डॉ.अण्णासाहेब शिंदे, डॉ.सदाशिव पाटील अंधारनेरचे सरपंच अशोक दाबके,यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते
याप्रसंगी स्वातीताई कोल्हे यांनी नॅशनल हायवे अथोरिटी च्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की मृत्युमुखी पडलेल्या लोकांना नियमाप्रमाणे 20 लाख रुपये मदत तुम्हाला द्यावीच लागेल.


उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले.
No Comment! Be the first one.