लोकार्थ प्रतिनिधी सी. पी. आंबीलवादे पैठण
राज्य शासनाच्या वतीने विविध साखर कारखान्याचे गळीत हंगाम दि.१५ ऑक्टोबर या कालावधीत सुरू करण्यासाठी सर्व साखर कारखानदारांना निर्देश देण्यात आले आहे. सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यासह अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटाला समोर जावे लागत आहे. शेतामध्ये लागवड केलेल्या उसाची वाढ न झाल्याने शेतकऱ्याचा ऊस गाळप साठी साखर कारखानदारांनी नेला तरी या उसाची रिक्वायरी मिळणार नसून यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ५ हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मा.खा राजू शेट्टी यांच्या माध्यमातून ऊसाला भाव मिळावे यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पैठण सह जिल्ह्यातील विविध तालुक्यात आंदोलन सुरू करण्याची रणनीती सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव पाटील मुळे यांनी ठिकठिकाणी ऊस उत्पादकाच्या बैठकी घेऊन आंदोलनात सहभाग घेण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला छावा संघटनेने पाठिंबा जाहीर करून ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसाला भाव जाहीर करून कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करावा तसेच ऊसाला भाव जाहीर न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग होण्याचा निर्णय छावा महाराष्ट्र सेनेचे जिल्हाप्रमुख साईनाथ पाटील कर्डिले यांनी घेतला आहे. यामुळे उसाला भाव मिळावा या मागणीच्या प्रश्नामुळे येणाऱ्या ऊस गळीत हंगामात ऊस आंदोलन पेटणार असे चित्र पाहायला मिळत आहे.
No Comment! Be the first one.