कला संचालकास हटवा अन् कला मंडळ बरखास्त करा; अन्यथा चित्रकला ग्रेड परीक्षेवर बहिष्काराचा कला शिक्षक महासंघाचा इशारा!
कला संचालनालय आणि सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (मुंबई) यांच्यामार्फत दरवर्षी संपूर्ण देशभरात १ हजारांहून अधिक केंद्रांवर चित्रकला ग्रेड परीक्षा (Art Grade Exams) आयोजित केल्या जातात. मात्र, या महत्त्वाच्या परीक्षांच्या नियोजन आणि व्यवस्थापनाकडे कला संचालनालयाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
१५ ऑगस्टपूर्वी बैठकीची अन् धोरणात्मक निर्णयांची मागणी
या प्रशासकीय अनास्थेविरोधात कला शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ ऑगस्टपूर्वी कला संचालकांनी कला शिक्षक महासंघासोबत तात्काळ बैठक घेऊन सर्व प्रलंबित मागण्या निकाली काढाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, निष्क्रिय ठरलेल्या कला संचालकास तातडीने त्यांच्या पदावरून हटवावे आणि नव्याने स्थापन करण्यात आलेले कला मंडळ तात्काळ बरखास्त करण्यात यावे, असा थेट इशारा महासंघाने दिला आहे.
३६ शहरांत आंदोलनाचा आणि बहिष्काराचा इशारा
वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास संपूर्ण देशभरातील चित्रकला ग्रेड परीक्षांवर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा प्रल्हाद शिंदे यांनी दिला आहे. याशिवाय राज्यातील ३६ प्रमुख शहरांमध्ये राज्य शासन, तंत्रशिक्षण मंत्री आणि कला संचालकांचा जाहीर तीव्र निषेध करण्यात येईल, असेही महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.