छत्रपती संभाजीनगर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आडगाव बुद्रुक येथे शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पावसातील दीर्घ खंड, अपुरा पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जळून गेल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.
शेतकऱ्यांनी कर्ज तसेच स्वतःचे पैसे खर्च करून पेरणी केली. मात्र पावसाअभावी पीक हातातून गेल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जालना जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी खासदार काळे यांनी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अनेक विहिरी, बोअरवेल, कूपनलिका आणि स्थानिक जलस्रोत कोरडे पडत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
पाहणीनंतर तहसीलदार शिवानंद बिडवे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल, कृषी आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार डॉ. काळे यांच्या प्रमुख मागण्या
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा.
- चालू वर्षाचे पीक कर्ज सरसकट माफ करून पूर्वीच्या कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी.
- पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने करून विलंब न करता मदत द्यावी.
- दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करून पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी.
- पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने टँकर सुरू करून आगामी पाणीटंचाईसाठी कृती आराखडा तयार करावा.
- शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई तातडीने द्यावी. नुकसान निश्चित करताना प्रत्यक्ष पीक नुकसान, पावसातील खंड, महसूल मंडळनिहाय परिस्थिती आणि उत्पादनातील घट यांचा विचार करावा.
- पीकविम्याशी संबंधित तांत्रिक अडचणी दूर करून सुलभ पोर्टल प्रणाली उपलब्ध करावी.
- शेतकरी आणि शेतमजुरांसाठी रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत.
- रब्बी हंगामासाठी बियाणे, खते आणि कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध करावा.
- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देऊन कृषी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीस स्थगिती देऊन सक्तीची वसुली थांबवावी.
- शेतसारा आणि इतर शासकीय देयकांमध्ये दुष्काळी सवलती लागू कराव्यात.
- पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाण्याला प्राधान्य देऊन विहिरी, बोअरवेल आणि जलसाठ्यांचे नियोजन करावे.
- दुष्काळग्रस्त शेतमजुरांसाठी रोजगार व उपजीविकेच्या विशेष उपाययोजना कराव्यात.
- शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शुल्कमाफी आणि आवश्यक शासकीय सवलती द्याव्यात.
- जिल्हास्तरावर दुष्काळ नियंत्रण कक्ष सुरू करून पाणी, चारा, पीकविमा, पंचनामे आणि रोजगारासंबंधी तक्रारींचे तातडीने निराकरण करावे.
खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती केवळ कागदोपत्री आकडेवारीवर न पाहता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले असून शासनाने विलंब न करता मदत करावी.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीमंत उकिर्डे, कार्याध्यक्ष विनोद देहाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संदीप बोरसे, कोषाध्यक्ष अशोक नाबदे, सुधीर मुळे, जगदीश डवले, राहुल सावंत, तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष सावता गाडेकर, कल्याण चव्हाण, शिवाजी ढाकणे, ज्ञानेश्वर पठाडे यांच्यासह शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महसूल, कृषी आणि पोलीस विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
No Comment! Be the first one.