लोकार्थ प्रतिनिधी मदन पाटील हिंगोली
औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले येथील श्री नागनाथ मंदिर सोमवारपासून (दि. ५) भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णतः बंद राहणार आहे. पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी स्पष्ट केले
मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे रविवारी (दि. ४) दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी श्री नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रांगा लावल्या होत्या. मंदिर बंद होण्यापूर्वी दर्शन घेण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ कायम होती.
श्री नागनाथ मंदिराच्या प्राचीन दगडी वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून सुमारे साडेसात कोटी रुपयांची कामे केली जात आहेत. मंदिराच्या दगडी भिंती, खांब आणि कमानींची दुरुस्ती, दगडांमधील जीर्ण झालेले सांधे भरणे, खराब झालेले दगड बदलणे, गळती रोखणे तसेच जीर्ण पायऱ्यांच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. मंदिराचे मूळ स्वरूप, प्राचीन शिल्पकला आणि स्थापत्यशैली कायम ठेवून पारंपरिक पद्धतीने ही कामे केली जात आहेत. यासाठी सुमारे ४० कुशल कारागीर आणि १५ मजूर कार्यरत आहेत.
मंदिर परिसराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळील प्राचीन पायऱ्यांचीही पुरातत्त्व विभागाने चाचणी खोदाई केली आहे. या खोदाईमध्ये जमिनीखाली आठ पायऱ्या आढळून आल्या होत्या. पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच मंदिर आणि परिसरातील संवर्धनाची कामे केली जात आहेत.
कामादरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि दुरुस्तीच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


No Comment! Be the first one.