‘पैसे दिले नाही तर तुला, पत्नी-मुलांना जीवे मारू’ची धमकी; बांधकाम साईट बंद पाडण्याचाही प्रयत्न
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेले एक कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह तब्बल दीड कोटी रुपये परत केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिकाकडे अतिरिक्त एक कोटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानपुरा परिसरात समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्यावसायिकासह त्याची पत्नी व मुलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पाच जणांसह दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनिल शामराव पाटील (६१), हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी जानेवारी २०२४ मध्ये राहुल चाबुकस्वार व आकाश साळुंखे यांच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी एक कोटी रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर रोख व ऑनलाइन पद्धतीने मुद्दल व व्याजासह सुमारे एक कोटी ५० लाख रुपये परत केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, पैसे परत करूनही राहुल चाबुकस्वार, प्रविण गरबडे व अन्य साथीदारांकडून आणखी एक कोटी २५ लाख रुपये देण्याची मागणी सुरू असल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर ज्योतीनगर येथील नवीन बांधकाम प्रकल्पातील प्रत्येकी ७५ लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट, म्हणजेच सुमारे दीड कोटी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून देण्याचा दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मागणी पूर्ण न केल्यास व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच विविध बांधकाम साइटवरील कामे बंद पाडण्याची धमकी देऊन प्रत्यक्ष कामात अडथळे निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.
No Comment! Be the first one.