लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न!”;
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
नवी दिल्ली येथे ७ ऑक्टोबर रोजी इंडिया आघाडीच्या खासदारांना अडवून कथित बळाचा वापर व लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने ७ ऑक्टोबर हा ‘लोकशाहीचा काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार निवडणूक प्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पारदर्शकता व उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने जंतर-मंतरकडे जात असताना त्यांना अडविण्यात आले व बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
“लोकशाहीमध्ये सत्तेला प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. निवडणूक प्रक्रियेबाबत पारदर्शकता मागणे आणि शांततापूर्ण आंदोलन करणे हा घटनात्मक अधिकार आहे. या अधिकारांचा सन्मान होणे आवश्यक आहे,” असे काँग्रेसच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बळाचा वापर अथवा लाठीचार्जासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जखमी आंदोलनकर्त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत द्यावी, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने उपस्थित करण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेतील प्रश्नांवर तथ्याधारित व सार्वजनिक उत्तर द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी खासदार अँड. तुकाराम रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख, अजित वरपुडकर, अतिक उर रहेमान, सुहास पंडित, प्रा. तुकाराम साठे, शेख खाजा, सत्तार पटेल, अमोल देशमुख, अब्दुल सईद, दिगंबर खरवडे, खादीरलाला हाश्मी, अंगद सोगे, शेख शमशोद्दीन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No Comment! Be the first one.