सावरगावात उघड्यावर रुग्ण तपासणीची वेळ
लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरु/कन्नड
“आरोग्यम् धनसंपदा” म्हणत शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवित असताना, कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे मात्र आरोग्य व्यवस्थेचेच वाभाडे निघाले आहेत. सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत असून येथील इमारत आता रुग्णालयापेक्षा भूत बंगल्यासारखी भासत आहे. या गंभीर प्रकारामुळे सावरगावसह परिसरातील हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
ग्रामपंचायतीसमोर मांडला आरोग्याचा बाजार!
धक्कादायक बाब म्हणजे, उपकेंद्राला स्वतःची हक्काची जागा असूनही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उघड्यावर, उन्हात बसून रुग्ण तपासावे लागत आहे ना पंखा, ना बेड, ना औषधांचा साठा, ना महिलांसाठी पडदा.
गरोदर मातांची तपासणी, लहान बालकांचे लसीकरण, वृद्धांची तपासणी हे सर्व उघड्यावरच सुरू आहे. यामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असून, गोपनीयता आणि स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष इमारतीची पाहणी केली असता अंगावर काटा येईल अशी अवस्था आहे.
भिंतींना २ ते ३ इंचाच्या भेगा, खिडक्या-दरवाजे गायब, छताचे प्लास्टर डोक्यावर पडण्याच्या स्थितीत, आणि संपूर्ण इमारतीवर ४-५ फूट वाढलेली झाडे-झुडपे व गवत
ही इमारत कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. सुदैवाने येथे सध्या कोणी जात नसल्याने जीवितहानी टळली आहे, पण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा सापळा तसाच उभा आहे.
प्रशासन झोपले का? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
सावरगाव हे मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे. येथे वेळेवर प्राथमिक उपचार मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु किरकोळ तापासाठी देखील नागरिकांना १०-१५ किलोमीटरवरील पिशोर किंवा कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. रात्री-अपरात्री आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला दगावण्याचीच वेळ येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीने ठराव देऊन, निवेदने देऊनही तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि बांधकाम विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
तात्काळ कारवाईची मागणी
सावरगावकरांची एकच मागणी आहे या जीर्ण इमारतीचा तात्काळ लिलाव करून नवीन सुसज्ज आरोग्य उपकेंद्राची इमारत मंजूर करा! तोपर्यंत पर्यायी जागेत सर्व सोयीसुविधांसह आरोग्य सेवा सुरू करा.जर येत्या ८ दिवसात प्रशासनाने दखल घेतली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाने या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन सावरगावच्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.