शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत धर्मांतर केल्याचा आरोप; वैजापूर न्यायालयाचा दणका
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
वैजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोरसर येथील शांतीसदन प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करून देण्याचे आमिष दाखवत धर्मांतर केल्याच्या आरोपाप्रकरणी पाच आरोपींना वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. फादर सुदाम उबाळे, फादर जेरॉल्ड रिबेलो, फादर आशिष म्हस्के, फादर संजय रुपेकर आणि फादर विनोद शेळके या पाचही आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
फिर्यादी बाळासाहेब आप्पासाहेब साठे (वय ३७, रा. वाहेगाव-मांजरी, ता. गंगापूर, ह.मु. वैजापूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना व त्यांच्या पत्नी पूजा यांना बोरसर येथील शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त करून कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी धर्मांतर करावे लागेल अथवा पैसे द्यावे लागतील, असे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. त्यांच्या इच्छेविरुद्ध धर्मांतर करून फसवणूक केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात फादर सुदाम उबाळे (रा. माळीघोगरगाव), फादर जेरॉल्ड रिबेलो (रा. बोरसर, मूळ रा. वसई, मुंबई), फादर आशिष म्हस्के (रा. माळीघोगरगाव), फादर संजय रुपेकर (रा. सेंट थॉमस चर्च, सेव्हन हिल, छत्रपती संभाजीनगर) आणि फादर विनोद शेळके (रा. जामगाव, ता. गंगापूर, मूळ रा. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिस व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. ८ ऑक्टोबर रोजी सरकार पक्षातर्फे ॲड. नानासाहेब जगताप यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. भिवसने करीत आहेत. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता या प्रकरणातील पुढील पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.