लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू
कन्नड – कन्नडच्या राजकारणात आज एक अत्यंत नाट्यमय घडामोड घडली. सातत्याने पत्नी आमदार संजना जाधव यांच्यावर टीका करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आज थेट आमदार संजना जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झाले. मात्र, योगायोग असा की, यावेळी आमदार संजना जाधव स्वतः कार्यालयात उपस्थित नव्हत्या.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून हे पाऊल उचलले. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आमदार निधीतून आणि जिल्हा नियोजन समिती (DPDC) च्या माध्यमातून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा व वीज व्यवस्थापन तातडीने सुधारावे, तसेच पिशोर गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचे लेखी निवेदन त्यांनी दिले.
आमदार संजना जाधव अनुपस्थित असल्याने त्यांनी हे निवेदन कार्यालयातील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.
पती-पत्नीच्या राजकीय संघर्षात नवा ट्विस्ट
या भेटीमुळे कन्नड तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कारण हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असून संजना जाधव या त्यांच्या पत्नी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात पत्नी संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला होता. तेव्हापासून हर्षवर्धन जाधव हे सोशल मीडिया आणि जाहीर सभांमधून संजना जाधव यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत होते.
अशा टोकाच्या राजकीय संघर्षानंतर आज हर्षवर्धन जाधव थेट संजना जाधव यांच्याच कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी गेल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
तालुक्यात आता एकच चर्चा आहे – ही भेट खरंच शेतकऱ्यांच्या कळकळीतून होती की दोघांमधील राजकीय समेटाची ही पहिली पायरी आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे.
No Comment! Be the first one.