लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते
हिंगोली विरोधी पक्षांकडून देशात राजकीय व सामाजिक परिस्थिती, लोकशाही मूल्यांची होत असलेली पायमल्ली आणि वाढती अराजकता याविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी हिंगोली शहरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
या पदयात्रेचा उद्देश स्पष्ट करताना आ. मुटकुळे म्हणाले की, सध्या विरोधकांकडून न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि विविध तपास यंत्रणांवर वारंवार दबाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ‘लोकतंत्र बचाव अराजकता हटाव’ ही पदयात्रा काढण्यात येत आहे.
ही पदयात्रा १४ नोव्हेंबर शनिवारी सकाळी १० वाजता हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून सुरू होईल पोस्ट ऑफीस रोड, जवाहर रोड मार्गे या पदयात्रेचा समारोप गांधी चौक येथे जाहीर सभेने होणार आहे. जाहीर सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा संयोजक सुनील राणे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,माजी आमदार गोविंद केंद्रे यांच्यासह जिल्हा प्रभारी संजय कौडगे,राज्यसभा सदस्य रामराव वडकुते,आमदार प्रज्ञाताई सातव,जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
ही लढाई सर्वसामान्यांच्या भविष्याची आणि संविधानाच्या रक्षणाची आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस खासदार रामराव वडकुते, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, विलास गोरे, रजनीश पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

No Comment! Be the first one.