रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी आलेच पाहिजे! १६ ऑगस्टनंतर कारवाईचा बडगा; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा कडक इशारा
महाराष्ट्रात राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रवाशांशी संवाद साधताना रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, अशी कडक भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. येत्या १६ ऑगस्टनंतर ज्या चालकांना मराठी भाषेत बोलता येणार नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल, असा थेट इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
१ लाखांहून अधिक अमराठी चालकांना मराठीचे प्रशिक्षण
परिवहन विभागाने मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर बिगर-मराठी चालकांना मराठी शिकवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
-
मराठी भाषा विभाग
-
मुंबई मराठी साहित्य संघ
-
राज्य मराठी विकास संस्था
-
कोकण मराठी साहित्य परिषद
या प्रमुख संस्थांच्या माध्यमातून राज्यभरात १ लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना दैनंदिन व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्णपणे देण्यात आले आहे.
तज्ज्ञांमार्फत तयार केला विशेष अभ्यासक्रम
सुरुवातीला या निर्णयाला काही वर्गांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रवाशांशी रोजच्या प्रवासात कसा संवाद साधायचा, भाड्याचे पैसे किंवा ठिकाणांबद्दल मराठीत कसे बोलायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भाषा तज्ज्ञांमार्फत छोटेखानी अभ्यासक्रम तयार करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून अनेक चालकांनी स्वत:हून मराठी शिकण्याची तयारी दाखवली आहे.
१६ ऑगस्टनंतर काय होणार?
परिवहन मंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर आता राज्यातील सर्वच रिक्षा व टॅक्सीचालकांना प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचाच वापर करावा लागणार आहे. १६ ऑगस्टनंतर परिवहन विभाग याबाबत प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणी मोहीम तीव्र करण्याची शक्यता आहे.