जुने कायगाव येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या बेमुदत सत्याग्रहास सुरुवात
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3900 पहिली उचल जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी ऊस उत्पादक संघर्ष समिती, गंगापूर समन्वय समितीच्या वतीने भाऊसाहेब शेळके विनोद काळे यांनी जुने कायगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाने दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ऊसदरातील तफावतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आंदोलनानंतर शासन-प्रशासनाच्या मध्यस्थीने उसाला पहिली उचल ३९०० सह एकूण तीन हप्त्यात प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर जाहीर करण्यात आला. मात्र, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील साखर कारखानदारांकडून प्रतिटन २९०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंतच दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
साखर कारखानदारांवर मनमानीचा आरोप
डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशींचे उल्लंघन होत असून, बाजारात साखरेचा ठोक विक्री दर प्रतिक्विंटल सुमारे 4 हजार ८०० रुपयांपर्यंत असतानाही आणि उप पदार्थाच्या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. बारामती अॅग्रो, पंचगंगा शुगर, मुक्तेश्वर शुगर, छत्रपती संभाजी साखर उद्योग, जय हिंद शुगर यांसह जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांकडून संगनमताने कमी दर जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम
प्रशासनाने या गंभीर विषयात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित साखर कारखानदारांची बैठक बोलवावी आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातील उसालाही प्रतिटन ४ हजार २०० रुपये दर जाहीर करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांत ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास सुरू असलेला सत्याग्रह अधिक आक्रमक पद्धतीने करण्यात येईल, असे ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याच्या जीवितास किंवा मालमत्तेस धोका निर्माण झाल्यास शासन, स्थानिक प्रशासन आणि संबंधित साखर कारखानदार जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक शिरसाठ,देविदास पाठे पाटील,संपत रोडगे भाऊसाहेब गवळी ,नाना पाचपुते,काका मोगल,किशोर गाडेकर,समाधान गायकवाड,गजानन गायकवाड,अरुण सागर,अशोक करडे,अमोल वायसळ,अवधूत वायसळ, आदी शेतकरी उपस्थित राहिले


No Comment! Be the first one.