सदाचार संवर्धन ज्येष्ठ नगरी संस्थेच्या वतीने दीपोत्सव संगीत सभेचे विशेष आयोजन आयोजन केले होते
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगरच्या पं. विश्वनाथ दाशरथे यांनी आपल्या गायनाची सुरुवात “पाहुनी तव वदना गणपती आनंद मज झाला” या गणेश वंदनेने केली. त्यानंतर वाढदिवसासाठी ” शरद शतम” हे गीत गायले. वयाची 85 वर्षे पूर्ण केलेल्या श्री . विष्णुपंत व्यास यांच्यासाठी खास “आज सोन्याचा दिस… कसे व्हावे उतराई” हे मराठीचे टागोर म्हणून ज्यांना गौरवले गेले ते श्रेष्ठ कविवर्य श्री.दि. इनामदार यांचे गीत तितक्याच भावपूर्ण पद्धतीने गायले. राग शिवरंजनी मध्ये “हे शिवगण गरजत शंभो हर हर हर” या मध्यलय एकतालातील स्वतः रचलेल्या बंदिशी द्वारे श्री विश्वेश्वर महादेवाची स्वर पूजा बांधली. त्याचा मंद्र सप्तकातील खर्जापासून तार सप्तकातील धैवता पर्यंतचा स्वरांचा प्रवास श्रोत्यांना खिळवून ठेवणारा होता. दमदार आलापी, तालाच्या मात्रांच्या घाटाने जाणारे बेहेलावे आणि छूट तान, गमकाची तान, जबड्याची तान, अलंकारिक तान अशा वैविध्यपूर्ण तीनही सप्तकात चपळाईने आणि कल्पकतेने फिरणाऱ्या तानांनी रसिकांमध्ये देखील चैतन्य निर्माण केले.
त्यानंतर सुरू झाली ती नाट्यगीतांची आतिशबाजी. दीपोत्सव संगीत सभेच्या निमित्ताने या आतिषबाजीला विशेष महत्त्व होते. अर्थात ती तितकीच आनंददायी आणि वातावरण प्रसन्न करणारी ठरली . “या भावनातील गीत पुराणे”, “या नवनवल नयनोत्सवा”, “सोहम हर डमरू बाजे”, “घेई छंद मकरंद”, “सुरत पिया की न छिन बिसराए”, “लाल शाल जोडी जरतारी” अशा लोकप्रिय नाट्यगीतांची मालिका अत्यंत रंगतदार पद्धतीने आणि स्वरलालीत्याने अप्रतिम सादरीकरणाच्या माध्यमातून अर्थवाही पद्धतीच्या भावप्रकटीकरणातून श्रोत्यांसमोर ठेवली आणि “प्रथम तुझ पाहता जीव वेडावला” ही रचना श्रोत्यांना चुटपुट लावून गेली . त्यानंतर श्रोत्यांच्या आग्रहास्तव “मर्मबंधातली ठेव ही” या पटदीप रागातील रागावर आधारित नाट्यगीतात तीहाई आणि दोन मात्रांपासून दोन आवर्तनापर्यंतच्या तानांनी उत्तम स्वरसंधान साधले .
कानडा राजा पंढरीचा, अबिर गुलाल, माझे माहेर पंढरी यातून फुललेल्या भक्तीमय वातावरणाच्या समारोपाला “कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर” या भैरवीच्या ओझरत्या सुरावटीने त्यांनी आपल्या मैफिलीची सांगता केली .
त्यांना तबल्यासाठी श्री धनंजय जळगावकर, संवादिनीवर श्री विनायक पांडे , बासरी रुद्र देशपांडे तानपुऱ्यावरती आदित्य वाघमोडे आणि सारंग जोशी आणि सह गायनासाठी उत्कर्ष वाघ व शाल्मली दाशरथे यांनी साथ संगत केली या मैफिलीचे सूत्रसंचालन श्री अनिल कुलकर्णी यांनी केले कलाकारांचा परिचय सौ कुलकर्णी यांनी करून दिला कलाकारांचे स्वागत आणि आभार संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी मानले . या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव बाळासाहेब देशपांडे आणि कोषाध्यक्ष अविनाश ओक, संभाजीनगर प्रदेश जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत आचार्य, निवृत्त न्या. श्री. पुराणिक, स्वरनिनादचे श्री. चंद्रशेखर घुगे, कुलश्रीच्या सौ. सुचिता सेवेकरी , ॲड. संगीता भट्टड यांच्यासह सदाचार संवर्धन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व सभासदांसह शहरातील अनेक रसिक मोठी गर्दी करून होते .

No Comment! Be the first one.