लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
वैजापूर येथे दलित कुटुंबातील रोहित पठारे यांची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भीमशक्तीचे नेते मा. चंद्रकांत हंडोरे साहेब आणि भीमशक्तीचे मराठवाडा अध्यक्ष मा. पंडितभाई नवगीरे यांनी वैजापूर येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मा. पंडितभाई नवगीरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना या अमानुष हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करावी, दोषींना कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत व संरक्षण मिळावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकजुटीने पुढे आले पाहिजे. अन्यायाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करून पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
या भेटीदरम्यान इतर सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
फोटो ओळ : वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करताना भीमशक्तीचे नेते मा. चंद्रकांत हंडोरे साहेब, भीमशक्तीचे मराठवाडा अध्यक्ष मा. पंडितभाई नवगीरे व इतर कार्यकर्ते.
No Comment! Be the first one.