बुलढाण्यात नवजात बालिकेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
लोकार्थ प्रतिनिधी अक्षय थिगळे
बुलढाणा : ज्या वयात आईच्या कुशीत विसावायचे, मायेची ऊब अनुभवायची आणि नव्या जगाची ओळख करून घ्यायची, त्या वयात अवघ्या दोन दिवसांच्या चिमुकलीच्या नशिबी मृत्यू आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना बुलढाणा शहरात समोर आली आहे. शहरातील धाड नाका परिसरातील तलावाच्या काठावर एका बेवारस वायरच्या थैलीत नवजात बालिकेचा मृतदेह आढळून आला. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धाड नाका परिसरातील तलावाच्या काठावर काही नागरिक फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना तेथे एक बेवारस थैली पडलेली दिसली. संशय आल्याने नागरिकांनी पाहणी केली असता, त्या थैलीमध्ये नवजात बालिकेचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार समोर येताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने बुलढाणा शहर पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे किंवा धागेदोरे मिळतात का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, मृत बालिका अवघ्या दोन दिवसांची असावी. मात्र, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. या बालिकेचा जन्म नेमका कुठे झाला? तिचा मृत्यू कशामुळे झाला? मृत्यूनंतर तिचा मृतदेह तलावाच्या काठावर आणून कोणी टाकला की या घटनेमागे आणखी काही वेगळे कारण आहे? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

No Comment! Be the first one.