सुधारित वाण, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि साठवणूक व्यवस्थेवर संयुक्त संशोधन
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
बागायती पिकांच्या संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि विस्तार कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली यांच्यात 11 नोव्हेंबर 2026 रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
या करारावर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. इंद्र मणि आणि एनएचआरडीएफचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी स्वाक्षर्या केल्या. या कराराची अंमलबजावणी 2026 च्या रब्बी हंगामापासून सुरू होणार असून, त्याअंतर्गत विविध संशोधन प्रकल्प आणि तंत्रज्ञान विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांमधील संशोधन आणि विस्तार कार्यातील सहकार्य अधिक दृढ होणार आहे. विशेषतः कांदा व लसूण या महत्त्वाच्या बागायती पिकांचे उत्पादन वाढविणे, सुधारित वाण विकसित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन करण्यावर भर दिला जाणार आहे.
करारानुसार गरजेनुसार संशोधन कार्यक्रमांची आखणी करून बागायती पिकांचे नवीन वाण, उत्पादन तंत्रज्ञान आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. एनएचआरडीएफने विकसित केलेल्या कांद्याच्या प्रगत व आशादायी वाणांचे महाराष्ट्रातील लागवडीसाठी मूल्यमापन केले जाणार आहे. तसेच कांदा साठवणुकीच्या आधुनिक संरचनांमध्ये सुधारणा करून ऊर्जा वापर कमी करण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या वाणांचे तसेच कांदा बियाणे पेरणी व रोपलागवडीसाठी विकसित केलेल्या कृषी अवजारांचे इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये मूल्यमापन व प्रमाणीकरण करण्यासाठी एनएचआरडीएफ सहकार्य करणार आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून संयुक्त संशोधन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विकसित तंत्रज्ञानाचा शेतकर्यांपर्यंत प्रसार केला जाणार आहे.
या सहकार्यातून दोन्ही संस्थांतील शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्राध्यापकांना संशोधन व प्रशिक्षण सुविधांचा परस्पर लाभ घेता येणार आहे. तसेच वैज्ञानिक माहिती, प्रयोगांचे निष्कर्ष, तांत्रिक माहिती आणि विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली जाणार आहे. कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या संशोधन संचालकांच्या अध्यक्षतेखाली पुनरावलोकन व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येणार असून, या कराराचा कालावधी पाच वर्षांचा राहणार आहे.
या सामंजस्य करारामुळे बागायती पिकांच्या संशोधनाला नवी दिशा मिळण्यासोबतच कांदा व लसूण उत्पादक शेतकर्यांना आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित वाण, कार्यक्षम साठवणूक व्यवस्था आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. करारप्रसंगी एनएचआरडीएफचे अधिकारी उपस्थित होते. दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी परस्पर सहकार्याच्या माध्यमातून संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला.
No Comment! Be the first one.