भूमिहीन शेतमजूर, असंघटित कामगार आणि आर्थिक दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्याची मागणी; गंगापूर तहसीलदारांना निवेदन, मनरेगाची कामे सुरू करण्यासह कर्जाचे हप्ते स्थगित करण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आदिवासी भूमिहीन शेतमजूर, असंघटित कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. हाताला काम नाही, रोजगाराची संधी नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, यासह विविध ११ मागण्यांसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, तालुका गंगापूरच्या वतीने सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी म्हाडा अध्यक्ष, नाशिक विभाग राज्यमंत्री दर्जा प्राप्त शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशानुसार, प्रदेश सचिव तथा छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रभारी प्रमुख गोरख नाईक आणि छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख ११ मागण्या
- नुकसानभरपाई : गायरान जमिनीवर शेती करणाऱ्या आदिवासी भूमिहीन कुटुंबांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
- खावटी अनुदान : आदिवासी कुटुंबांसाठी खावटी अनुदान योजना तातडीने सुरू करावी.
- रोजगाराची हमी : मनरेगाअंतर्गत जास्तीत जास्त रोजगाराची कामे सुरू करावीत. रोजगार न मिळाल्यास पात्र मजुरांना बेरोजगारी भत्ता द्यावा.
- पिण्याचे पाणी : आदिवासी वस्त्या, तांडे आणि दुर्गम भागांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- रेशन धान्य : पात्र कुटुंबांना रेशन दुकानांमार्फत नियमित धान्य उपलब्ध करून द्यावे.
- घरकुलाचा लाभ : गायरान व गावठाण जमिनीवरील पात्र अतिक्रमणे नियमानुसार नियमित करून संबंधितांना घरकुलाचा लाभ द्यावा.
- स्थलांतरित मजुरांची नोंदणी : स्थलांतरित मजुरांची नोंदणी करून त्यांच्या कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- शैक्षणिक सवलती : आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात.
- पेन्शन व अनुदान : निराधार, विधवा, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय पेन्शन व अनुदान वेळेवर द्यावे.
- स्मशानभूमी व दफनभूमी : आदिवासी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आणि दफनभूमी उपलब्ध करून द्यावी.
- कर्जाचे हप्ते स्थगित : महिला बचत गट, मायक्रोफायनान्स संस्था आणि बँकांकडील कर्जाचे हप्ते सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात स्थगित करावेत.
संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
तहसील कार्यालयात निवेदन देताना एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य गंगापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब काकडे, तालुका सचिव सुभाष काकडे, युवा तालुका उपाध्यक्ष सोमीनाथ माळी, नेवरगाव सर्कल अध्यक्ष गीताराम काकडे, शिल्लेगाव सर्कल अध्यक्ष गोकुळ काकडे, शिल्लेगाव सर्कल कार्याध्यक्ष विक्रम काकडे, शिल्लेगाव टायगर फोर्स सर्कल अध्यक्ष भाऊराव काकडे यांच्यासह हरिचंद्र काकडे, भाऊसाहेब, चांगदेव सोनवणे, विजय गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आदिवासी, भूमिहीन आणि असंघटित कामगार कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा या दुर्बल घटकांच्या अडचणी आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते, याकडे संबंधित कुटुंबांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.