लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : छावणीतील केशर मॉलसमोर गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक नागरिकांनी पकडल्यानंतर पोलिस अंमलदारावरच हल्ला केल्याची घटना रविवारी (४ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. दगडाने डोक्यात मारल्याने पोलिस अंमलदार दीपक सोनवणे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिल कॉर्नरकडून येणाऱ्या ट्रकचा गोरक्षकांनी पाठलाग करून नेहरू चौकात तो अडवला. ट्रकमध्ये १६ गोवंश जनावरे निर्दयीपणे कोंबलेली आढळून आली. मोठा जमाव जमल्याने छावणी पोलिस ठाण्याचे अंमलदार दीपक सोनवणे हे होमगार्डसह घटनास्थळी पोहोचले. ट्रक पोलिस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिस गोवंश तस्करांना सोडून देत असल्याचा गैरसमज झाल्याने काही जणांनी सोनवणे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण सुरू केली. ओंकार उर्फ चिन्ना भंडारी याने दगडाने सोनवणे यांच्या डोक्यात मारले. जीव वाचविण्यासाठी पळत असतानाही त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी अतिरिक्त कुमक घेऊन घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. नितीन चौधरी, ऋषभ यादव, ओंकार भंडारी, धीरज साकल, व्यंकटेश यादव, जगदीश यादव, सागर केसरे आणि लखन यादव ऊर्फ बाबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा जणांना अटक झाली आहे. दरम्यान, ट्रकचालक रोशन थिटे याच्याविरुद्धही गोवंशाची निर्दयी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No Comment! Be the first one.