कन्नड प्रतिनिधी कार्तिक राजगुरु
कन्नड तालुक्यात यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. मका, कापूस, सोयाबीनसह सर्वच पिके माना टाकू लागली असून शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कन्नडच्या तहसीलदार सारिका भगत यांनी आज चिखलठाण, डोणगाव, कुंजखेडा गटातील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.
तहसीलदार भगत यांनी शेतात उभे असलेल्या वाळलेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून, कणसे न भरल्याने उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकरी १५ ते १८ हजार रुपये खर्च करूनही हातात काहीच येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
यावेळी तहसीलदारांनी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, पीक विमा, आणि नुकसान भरपाई पंचनाम्याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
या मागणीला जिल्हा परिषद सदस्या सुनंदाताई आन्नासाहेब चव्हाण आणि विभागप्रमुख कल्याण चव्हाण यांनी पाठिंबा देत, प्रशासनाने केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी चिखलठाणचे तलाठी गणेश मोहिते कृषी सहाय्यक अमोल वाळुंजे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप चव्हाण चिकलठाण, डोणगाव, कुंजखेडा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदारांनी प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी केल्याने प्रशासनाला खरी परिस्थिती समजेल आणि लवकरच मदत मिळेल, अशी आशा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

No Comment! Be the first one.