लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : नामांकित साबणांच्या ट्रेडमार्कसारखे हुबेहुब दिसणारे बनावट लेबल लावून साबणांची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याचा प्रकार जिन्सी पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ५३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भिमराज काळे (६४) आणि अशोक काळे (३४), दोघेही रा. वाडगाव, ता. पैठण, अशी आरोपींची नावे आहेत. आझम कॉलनी, रोशनगेट परिसरातील लतीफ किराणा दुकानात ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी विविध प्रकारचे साबणाचे बॉक्स आढळून आले. त्यावर ‘गायत्री GAYTRI’ तसेच नोंदणीकृत ट्रेडमार्क क्रमांकासारखी माहिती असलेली बनावट कागदी लेबले चिकटविण्यात आली होती.
पोलिसांनी एकूण २,०६७ साबणांचे बॉक्स, बनावट लेबले, विविध नावांचे साबण, पावती पुस्तके, वह्या आणि साबणांवर नाव उमटविण्यासाठी वापरले जाणारे स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा बनावट माल विक्रीच्या उद्देशाने साठविल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी रणजित पंडितराव थोरात यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३१८(४), ३(५) तसेच ट्रेडमार्क अधिनियम १९९९ मधील कलम १०३, १०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि. सुनील मोरे पुढील तपास करीत आहेत.

No Comment! Be the first one.