लोकार्थ प्रतिनिधी किशीर साळुंके वैजापूर
अन्न सुरक्षा मानके आणि नियमानुसार करण्यात आलेल्या तपासणीत एकूण ८६ गुणांपैकी केवळ ३६ गुण मिळाल्याने येथील भाग्योदय अग्रो इंडस्ट्रीजचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या ठिकाणी तेल रिपॅकिंग करण्यात येत होते. पथकाने येथील 23 लाख 32 हजार 455 रुपयांचे 10 हजार 798 किलो पामोलिन तेलाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागातील अन्न उत्पादक कंपनी व व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
शहरानजीकच्या गंगापूर रोडवरील घायगाव येथील मेसर्स भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये तेल रिपॅकिंग करण्यात येते. शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी सेफ फुड सेफ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अन्न व औषध विभागाच्या पथकाने अचानक तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत संबंधित कारखान्यात अन्न सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे तसेच स्वच्छतेचा प्रचंड अभाव असल्याचे दिसून आले. अन्न सुरक्षा मानके आणि नियमानुसार करण्यात आलेल्या या तपासणीत संस्थेला केवळ ३६ गुण (४२%) मिळाल्याने ती ‘अपात्र’ (Non-Compliance) ठरली आहे. पाहणी दरम्यान कारखान्यामध्ये कारखान्याची फरशी तेलकट व चिकट झालेली होती. अनेक ठिकाणी फरशा तुटलेल्या होत्या. उत्पादनासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य दर्जाचे असल्याचे कोणतेही प्रमाण किंवा चाचणी अहवाल मिळून आले नाही. अन्नपदार्थ आणि पॅकिंग साहित्य उघड्यावर जमिनीवर साठवून ठेवण्यात आले होते. साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. तेल साठवण्यासाठी स्टेनलेस स्टीलऐवजी लोखंडी टाक्याचा वापर केला जात होता. कारखान्याचे दरवाजे उघडे होते व खिडक्यांना कीटक प्रतिबंधक जाळ्या नव्हत्या. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये कीटक किंवा धूळ जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. कीटक नियंत्रणाचा केवळ दाखला होता, मात्र कोणतीही ठोस यंत्रणा किंवा अहवाल उपलब्ध नव्हता. येथील कामगारांच्या डोक्यावर घालण्याच्या टोप्या (Caps) देण्यात आल्या होत्या, मात्र हातमोजे आणि ॲप्रन उपलब्ध नव्हते. तसेच अन्न सुरक्षा प्रशिक्षण घेतलेला एकही कर्मचारी तिथे नव्हता. कारखान्यात तापमान नियंत्रित ठेवण्याच्या वेळेची नोंद नव्हती. तसेच रासायनिक पदार्थ आणि खराब झालेला माल वेगळा ठेवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नव्हती. या गंभीर बाबींची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने भाग्योदय ॲग्रो इंडस्ट्रीजला ‘त्रुटींची पूर्तता करा आणि अहवाल सादर करा’ असा कडक आदेश दिला आहे. शिवाय पथकाने तेथे मिळून आलेले 23 लाख 32 हजार 455 रुपयांचे 10 हजार 798 किलो पामोलिन तेलाचा साठा जप्त केला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजी अन्न व्यावसायिकांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले आहे.


No Comment! Be the first one.