बंधारा दुरुस्त करा, अन्यथा पाणीटंचाईला शासन जबाबदार! ग्रामस्थांचा आक्रमक इशारा
लोकार्थ प्रतिनिधी
सिल्लोड : अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती अद्याप न झाल्याने सिल्लोड तालुक्यातील नऊ गावांवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासन-प्रशासनाला जाग येत नसल्याने बोरगाव बाजार येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बंधाऱ्याचे काम तातडीने सुरू करा, अन्यथा आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला शासन-प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
२०२४-२५ मधील अतिवृष्टीमुळे पूर्णा नदीला आलेल्या महापुरात बोरगाव बाजार आणि बोरगाव सारवाणी परिसरातील कोल्हापुरी बंधारा वाहून गेला. या पुरामुळे गट क्रमांक १३, १४ व १५ यांसह अनेक शेतगटांतील जमिनीची धूप होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला; मात्र अद्याप काम मार्गी लागलेले नाही.
बंधारा दुरुस्त न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात पूर्णा नदीचे पाणी अडविता आले नाही. त्यामुळे बोरगाव बाजार, बोरगाव सारवाणी, बोरगाव वाडी, सोनप्पावडी, खातखेडा, म्हसला बुद्रुक, म्हसला खुर्द, डोईफोडा आणि पिरोळा या नऊ गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर बोरगाव बाजारचे सरपंच सय्यद सत्तार बागवान, उपसरपंच लक्ष्मण साखरे, ग्रामपंचायत सदस्य सुनील टेलर, दत्ता चव्हाण तसेच शेतकरी नंदू चौधरी, महेंद्र चव्हाण, सलीम शहा, संतोष पुरी आणि शाम अधिकार यांनी बंधाऱ्याची पाहणी करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बंधाऱ्याचे काम तातडीने सुरू करून ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आता तरी शासन-प्रशासन ठोस पावले उचलणार का? की नऊ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार? असा सवाल उपस्थित होत असून, ग्रामस्थांच्या आक्रमक प्रतिक्रियांमुळे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
No Comment! Be the first one.