पोलिसांची तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई
जयपाल ठाकूर
गंगापूर (प्रतिनिधी) : शिंदेवाडी फाट्याजवळ फायनान्स कंपनीच्या ६८ हजार ५६ रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यासाठी स्वतःच्या लुटीचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फायनान्स कंपनीचा फिल्ड असिस्टंट किरण पंढरीनाथ वैरागर याने दोन साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे पोलिस चौकशीत समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी किरण वैरागर, रवि ज्ञानदेव दरंदले आणि आकाश साहेबराव हटकर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
भारत फायनान्शियल इनक्लूजन लिमिटेडच्या गंगापूर शाखेत फिल्ड असिस्टंट म्हणून काम करणारा किरण वैरागर हा २१ सप्टेंबर रोजी लासूर परिसरात फायनान्सच्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी गेला होता. दिवसभरात त्याने ग्राहकांकडून ६८ हजार ५६ रुपये रोख जमा केले होते.
सायंकाळी शाखा व्यवस्थापक योगेश गिते यांनी किरणशी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी तो आयडियल स्कूलजवळ असून काही मिनिटांत कार्यालयात येत असल्याचे त्याने सांगितले. मात्र बराच वेळ उलटूनही तो शाखेत न आल्याने पुन्हा फोन केला असता मोबाईल बंद मिळाला. त्यामुळे शाखा व्यवस्थापकासह त्याचा मेव्हणा व मित्राने त्याचा शोध सुरू केला.
रात्री सुमारे दहा वाजता एका नागरिकाचा फोन आला. लासूर-गंगापूर रोडलगत किरण हात-पाय बांधलेल्या अवस्थेत पडला असून त्याच्या अंगावर जखमा आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किरणला ताब्यात घेतले.
सुरुवातीला किरणने चार अनोळखी व्यक्तींनी दोन मोटारसायकलींवरून येऊन आपल्याला अडविले, शेतात नेले आणि चाकूने जखमी करून बॅगेतील ६८ हजार ५६ रुपये व मोबाईल लुटून नेल्याची कहानी सांगितली. मात्र त्याच्या कथनावर शाखा व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या कथित लुटीमागील वेगळेच चित्र समोर आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शिंदेवाडी फाट्यावरच आखला कट!
पोलिसांच्या चौकशीत किरणने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मित्र रवि दरंदले याला पैशांची गरज होती. त्यामुळे फायनान्सची वसूल केलेली रक्कम हडप करून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा बनाव करण्याचा कट रचण्यात आला.
कटानुसार रवि दरंदले व आकाश हटकर हे प्लॅटिना मोटारसायकलवरून किरणला शिल्लेगावजवळ भेटले. त्यानंतर तिघे शिंदेवाडी फाट्याजवळील आयडियल इंग्लिश स्कूल परिसरात आले. तेथे किरणची मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली. त्यानंतर तिघेही दुसऱ्या मोटारसायकलवरून गंगापूर रोडने पुढे गेले आणि रस्त्यालगतच्या शेतात गेले.
तेथे किरणचे हात-पाय दोरीने बांधण्यात आले. तोंडाला रुमाल बांधण्यात आला. रविने चाकूने किरणचा शर्ट फाडला आणि त्याच्या बॅगेतील ६८ हजार ५६ रुपये व मोबाईल घेऊन रवि व आकाश तेथून निघून गेले, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर किरण शेतातून सरकत रस्त्याच्या कडेला आला आणि तेथून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र शाखा व्यवस्थापकाने सुरुवातीपासूनच किरणच्या कथनाबाबत संशय व्यक्त केल्याने पोलिस तपासाला वेगळे वळण मिळाले.
फायनान्सची रक्कम हडप करण्यासाठी लुटीचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जान्हवी शेखर व पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय पाखरे करीत आहेत.
No Comment! Be the first one.