लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे घनसावंगी
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी परमेश्वर प्रभाकर घोगरे यांनी पुढाकार घेतला आहे.
आपल्या शेतातील विहिरीतून तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून स्वखर्चाने पाईपलाईन टाकत त्यांनी शाळेपर्यंत पाणी पोहोचवले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सुरू असलेल्या नवीन शाळा इमारतीच्या बांधकामासाठीही या पाण्याचा उपयोग होणार आहे.
पितृपक्षाचे औचित्य साधत आई-वडिलांच्या स्मरणार्थ हा जलदानाचा उपक्रम राबविण्यात आला. पाणीटंचाईच्या परिस्थितीत स्वतःच्या शेतातील पाणी शिक्षणासाठी उपलब्ध करून देत घोगरे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
परमेश्वर घोगरे यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.
No Comment! Be the first one.