घाटावर कपडे आणि मोबाईल आढळले; नदीत उडी घेतल्याचा संशय, पोलिसांकडून शोधकार्य
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : बालानगर येथील ४५ वर्षीय साईनाथ लक्ष्मण गोर्डे हे आपेगाव येथून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरामागील गोदावरी घाटावर त्यांचे कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने त्यांनी नदीत उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कपडे व मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईलमधील संपर्क क्रमांकावरून गोर्डे यांची ओळख पटली.
सोमवारी सकाळपासून पैठण पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाकडून गोदावरी नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. गोर्डे हे बालानगर येथे मिस्तरी काम करीत असून त्यांची सासरवाडी आनंदपूर येथे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत पैठण पोलीस ठाण्याचे जमादार राजेंद्र जिवडे पुढील तपास करीत आहेत.

No Comment! Be the first one.