लोकार्थ प्रतिनिधी शरद गर्जे
आष्टी : जुन्या घटनेशी संबंधित व्हिडिओ सध्याच्या घटनेचा असल्याप्रमाणे सोशल मीडियावर पुन्हा प्रसारित करून गैरसमज व संभ्रम निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आष्टी पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या सोशल मीडिया तसेच विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात आहे. सदर व्हिडिओ हा जुना असून, सध्याच्या घटनेशी संबंधित असल्याप्रमाणे तो प्रसारित केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज व संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून, सदर व्हिडिओचा वापर राजकीय स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
मूळ घटना घडली त्यावेळी स्थानिक पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत परिस्थिती हाताळण्यात आली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नसलेला जुना व्हिडिओ पुन्हा प्रसारित करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार सुरेश आण्णा धस यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. राजकीय हेतूने अशा प्रकारे जुना व्हिडिओ वापरून बदनामी करण्यात येत असल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया अकाउंट्सची चौकशी करून व्हिडिओ कोणी प्रसारित केला, तो कुठून मिळविण्यात आला आणि तो सध्याच्या घटनेशी संबंधित असल्याचा गैरसमज निर्माण करण्यामागे कोणाचा उद्देश आहे, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातूनही या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनासोबत ‘मनोज चौधरी’, ‘Mla.balasaheb_ajabe_fc’, ‘राम खाडे युवा मंच’, ‘Rambhau_khade_official’ आणि ‘Ram_khade_fc’ या सोशल मीडिया अकाउंट्स/पेजवरील संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट व लिंक जोडण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
जुना व्हिडिओ नव्या घटनेचा असल्याचा भास निर्माण करून सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेऊन सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आमदार सुरेश धस समर्थ आक्रमक
Related Posts
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर भीषण हल्ला;
October 6, 2026
आमदार सुरेश धस समर्थ आक्रमक
October 6, 2026
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई; २१५ मोटारींचे कनेक्शन तोडले
October 6, 2026
No Comment! Be the first one.