जलजीवन मिशनवर कोट्यवधींचा खर्च करूनही नागरिक तहानलेले; गजानन कावरखे यांचा २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलनाचा इशारा
लोकार्थ गोपाल सातपुते
हिंगोली | गोरेगाव येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च होऊनही गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, गोरेगावमध्ये कोट्यवधींचा खर्च करूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. योजनेच्या कामांची गुणवत्ता, खर्च आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून दूरध्वनीद्वारे ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे प्रशासक असलेले विस्तार अधिकारी देशमुख यांच्याशी संपर्क साधून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
यावेळी गजानन कावरखे यांनी, जलजीवन मिशनवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही महिलांना पाण्यासाठी घागर मोर्चा काढावा लागत असेल, तर ही गंभीर बाब आहे. संबंधित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नागरिकांना तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. अन्यथा सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत प्रश्न असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी करावी व गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनात भास्कराव पाटील, संतोष कावरखे, विठ्ठल साळुंखे, कैलास देवकर, राजू देवकर, सुखदेव दादा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.
२३ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा दिल्याने आता प्रशासन गोरेगावचा पाणीप्रश्न किती तत्परतेने सोडवते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.