लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजी फाट्याजवळील एका बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात ३५ वर्षीय मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजेच्या सुमारास अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यात भलामोठा दगड घातल्याचे दिसून आले.
प्रवीण (वय ३५, रा. परभणी) असे मृत मजुराचे नाव असल्याचे तपासात समोर आले आहे. तो बंद पडलेल्या कंपनीच्या खोलीत निर्जनस्थळी राहत होता. मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. आई-वडिलांपासून दूर तो एकटाच राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त मझहर सय्यद, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील आणि संजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे जमा केले आहेत.
प्रवीण याची हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेच्या वेळी त्याच्यासोबत कोणी होते का, याचाही शोध घेतला जात आहे. या मजुराच्या काही साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे वाळूज एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
No Comment! Be the first one.