लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ‘तुमचे बँक खाते दहशतवादी प्रकरणाशी संबंधित आहे. पोलिसांची टीम हातकडी घेऊन घरी येईल, अटक करून नेईल’, अशी दहशतवादी कारवाईची धमकी देत सायबर भामट्यांनी ६७ वर्षीय महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना २३ ते ३० सप्टेंबरदरम्यान घडली.
सिडको परिसरातील महिलेच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करण्यात आला. आरोपींनी राष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी प्रकरणाचा बनाव करून अटकेची तसेच माध्यमांना बोलावण्याची धमकी दिली. या भीतीपोटी महिलेने २९ सप्टेंबरला ८ लाख आणि ३० सप्टेंबरला ५ लाख रुपये अशा एकूण १३ लाख रुपयांचे RTGS केले.
या प्रकरणी ४ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्हॉट्सॲप क्रमांक आणि बँक खातेधारकांविरुद्ध पोलिस तपास सुरू आहे.
No Comment! Be the first one.