अपंग जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष शेख अनिस यांचा निर्धार
चिपळूण | प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी शासनाकडून दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावे, यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र लढा उभारणार असल्याचा निर्धार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार शेख अनिस यांनी व्यक्त केला.
चिपळूण येथे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज्यातील विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेख अनिस म्हणाले की, दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजगाराच्या मर्यादित संधी, वाढती महागाई आणि दैनंदिन जीवनातील विविध समस्यांमुळे दिव्यांगांना आर्थिक आधाराची गरज आहे. त्यामुळे शासनाने दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असून गरज पडल्यास आंदोलनाची भूमिका घेतली जाईल.
मेळाव्याला अपंग जनता दलाचे राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब दासपुते, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश नगर, राज्याध्यक्ष मीनाक्षी धोत्रे, राज्याध्यक्ष झाकीर शेख, राज्यसचिव कलीम शेख, राज्य महासचिव रजित शहा राजे संपर्कप्रमुख लक्ष्मण वाघे , राज्य उपाध्यक्ष सलीम फेजर, जालना जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सविता बोराडे, जालना जिल्हा उपाध्यक्ष राहुल मुळे, राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष सरला लुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व चिपळूण परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग युवक-युवतींना एकमेकांशी परिचय करून देण्याची संधी मिळाली. दिव्यांगांच्या सामाजिक, आर्थिक आणि वैवाहिक प्रश्नांसाठी संघटना यापुढेही विविध उपक्रम राबवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असून सहा हजार रुपये मानधनाचा प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडणार, असा निर्धार यावेळी अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
No Comment! Be the first one.