अॅक्सलमधून टायर निखळल्याने बस रस्त्यावर फरफटली; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे शनिवारी (ता. ३) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास धावत्या एसटी महामंडळाच्या बसचा अॅक्सलमधून उजव्या बाजूचा टायर निखळून पडला. गाडी सुमारे वीस फूट अंतरावर फरफटत गेली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून ३८ प्रवाशांचे प्राण वाचवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
छत्रपती संभाजीनगरहून दुपारी पावणेदोन वाजता ही बस डेपोतून निघाली होती. शहरापासून ४५ ते ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करीत बस गंगापूर तालुक्यातील जुने कायगावजवळ येताच हा अपघात झाला.
सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही बस शिरूर डेपोची असून चालक व्ही. के. शेळके व वाहक ए. एस. माने होते.
अपघातग्रस्त बसचा क्रमांक एमएच १४ एमएच ७०२५ असून छत्रपती संभाजीनगर-नेवासा फाटा-अहिल्यानगर-शिरूर-पुणे मार्गावर जाणारी ही बस होती.
गंगापूर एसटी डेपोचे आगार प्रमुख विजय बोरसे, वाहन परीक्षक व्ही. के. कुकलारे, हेड मेकॅनिक साठे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त बसची पाहणी केली. प्रवासी सुखरूप आहेत की नाही याची आस्थेने चालक, वाहक यांच्याकडे चौकशी केली.
कसा घडला अपघात
स्पीडब्रेकर व गाव जवळ आल्याने चालकाने बसचा वेग कमी केला होता. त्यामुळे ४० च्या स्पीडमध्ये रनिंगमध्ये अॅक्सलमधून समोरचा उजव्या बाजूचा टायर निघून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. तर दुसऱ्या बाजूचाही टायर निघाला. गाडी थेट अॅक्सलवर खाली आदळली. प्रवासी प्रचंड घाबरले, पण सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही प्रवाशांना थोडाफार मुक्का मार लागला. गाडीतून सर्व प्रवासी सुखरूप उतरवून पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसमध्ये बसवून दिले. रोडवर असलेल्या अपघातग्रस्त बसला क्रेनच्या साहाय्याने उचलून घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू होते.
शिरूर डेपोत एक वर्षांपूर्वी ९ ते १० नवीन शोरूम लालपरी एसटी बस आल्या होत्या, त्यातील ही बस होती. मात्र एका वर्षातच त्या बसचा अॅक्सल निघून अपघात झाला. एसटी महामंडळ च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बस डेपोतून चेक होऊनच निघते. ही पण चेक होऊन निघाली होती. असे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
तांत्रिक बिघाडामुळे सदरील प्रकार घडला.यात चालकाचा दोष नाही,
गाडीचा दोष तपासणीत निष्पन्न होईल. या विषयी ऑनलाईन तक्रार करून शिरूर डेपो व लेलंड कंपनीला माहिती दिली आहे.
विजय बोरसे, आगार प्रमुख, गंगापूर

No Comment! Be the first one.