लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे पैठण
पैठण बीड सह मराठवाड्यातील विविध गावातील
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित फसवणूकप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
३ कोटी २७ लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी दहा आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने प्रॉडक्शन वॉरंटवर बीड येथील मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर बुधवार (दि. ३०) रात्री साडेआठ वाजता आरोपींना पैठण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . या कारवाईमुळे ज्ञानराधा बँक प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. अर्चना सुरेश कुटे (४७, बीड), आशा पद्माकर पाटील ऊर्फ पाटोदेकर (५३, सध्या सोलापूर), शंकरराव सटाले (५३, बीड), दादाराव हरिदास उंदरे (५४, छत्रपती संभाजीनगर), रघुनाथ सखाराम खरसाडे (३८, बीड), रविंद्र मधुकर तलबे (३९, बीड), कैलास काशीनाथ मोहिते (३६, बीड), रविंद्र श्रीरंग यादव (५२, बीड), यशवंत वसंतराव कुलकर्णी (५४, बीड) आणि वैभव यशवंत कुलकर्णी (२५, बीड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पैठण शहरातील व्यवसायिक मुकेश श्रीचंद पंजवाणी यांच्यासह ३२ ठेवीदारांनी पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०२४ दाखल असून कलम ४२०, ४०९, १२०(ब), २०१ भादंवि, एमपीआयडी कायदा कलम ३ व ४ तसेच अनियंत्रित ठेव योजनांवरील बंदी कायदा २०१९ मधील कलम २१ व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेत जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारण्यात आल्या; मात्र पैसे परत मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ठेवीदारांकडून अर्ज व पेमेंट स्लीप भरून घेण्यात आल्या, मात्र प्रत्यक्ष रक्कम देण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही ठेवीदारांनी बीड येथील मुख्यालयातही धाव घेतली; मात्र त्यांनाही रक्कम मिळाली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ज्ञानराधा बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, अर्चना कुटे तसेच पैठण शाखेचे व्यवस्थापक पवळ, प्रादेशिक व्यवस्थापक लाखे आणि शाखा व्यवस्थापक वैजनाथ डाके यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
सदरील कारवाई छत्रपती संभाजी नगर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक राम.जी.हत्तरगे यांच्या पथकाने केली आहे.

No Comment! Be the first one.