डोक्यात दांडा-काठीने मारहाण केल्याचा आरोप; गंभीर दुखापतीनंतर मृत्यू, गुन्ह्यात खुनाच्या कलमाची वाढ
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे झालेल्या वादातून ४२ वर्षीय गौतम लक्ष्मण उबाळे यांना दांडा व काठीने मारहाण केल्याच्या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. उपचार सुरू असताना गौतम उबाळे यांचा शनिवारी (दि. ३) मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अजय बाबासाहेब उबाळे (वय २२, रा. वरखेड) याला शिल्लेगाव पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी रात्री अटक केली होती. आता गौतम यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात कलम १०३(१) BNS ची वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजता वरखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे गौतम उबाळे व अजय उबाळे हे दोघे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अजय उबाळे याने गौतम उबाळे यांच्या डोक्यात व कपाळावर लाकडी दांडा व काठीने मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांत दाखल करण्यात आली.
मारहाणीत जखमी झालेल्या गौतम उबाळे यांना सुरुवातीला शासकीय रुग्णालय, गंगापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे हलविण्यात आले. उपचारानंतर २२ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी गौतम उबाळे यांनी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात उपस्थित राहून दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ४६२/२०२६ अन्वये BNS कलम ११८(१) व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. जखम गंभीर स्वरूपाची असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी गुन्ह्यात कलम ११८(२) BNS ची वाढ करण्यात आली.
दरम्यान, अजय उबाळे याचा पोलिसांकडून शोध सुरू होता. अखेर २ ऑक्टोबर रोजी रात्री १०.०९ वाजता त्याला कायदेशीररीत्या अटक करण्यात आली.
मात्र, गौतम उबाळे यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने ते २९ सप्टेंबर रोजी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल झाले होते. उपचार सुरू असतानाच ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात BNS कलम १०३(१) ची वाढ करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

No Comment! Be the first one.