लोकार्थ प्रातिनिधी
लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेने प्रा. विजय पोहनेरकर यांच्या हासू आणि आसू या हास्य कवितांच्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले होते . संस्थेच्या लालबहादूर शास्त्री सभागृहाच्या प्रांगणात लिंबाच्या पारावर ही हास्य कवितांची मैफिल मजबूत जमली .
परस्परांशी बोलणं विसरलेली माणसं केवळ इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमांवरील इमोजी आणि स्टिकर्स वापरून संवाद पूर्ण करणारी माणसं अशा पद्धतीने एकत्र येऊन साहित्यातील हास्य रसाचा असा निखळ आनंद घेऊ शकतात याचे एक सुंदर उदाहरण यानिमित्ताने शास्त्रीनगर आणि संभाजीनगर येथील साहित्य प्रेमी रसिकांनी अधोरेखित केले आहे .
एकेकाळी शेपूट गळून गेलेला माणूस जर बोलणं विसरला तर त्याला पुन्हा नव्याने शेपूट येईल अशी कवी कल्पना मांडतानाच दोन माकडांच्या संवादातून माणसांशी संपर्क ठेवू नका माणसं माणसांशी माणसासारखं वागत नाहीत असे विपरीत सामाजिक परिस्थितीवर टीकास्त्र कवी पोहनेरकर यांनी सोडले .
पती-पत्नी यांच्या लटक्या भांडणांचा वापर त्यांनी विविध उदाहरणे देत ‘घराघरात तिचीच सत्ता , माझ्या डोक्यात घालेल बत्ता’ असे विनोदी व्यंग उधृत करत मिश्किलपणे स्वतःच्याच पत्नीसमोर सगळ्यांच्या मनातल्या भावना उलगडून दाखवणारी कविता लिलया मांडली . याच अनुषंगाने त्यांनी टाटा, बिर्ला ,अडाणी यांना आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांना सगळ्याच मुलींना पुण्यातला नवरा पाहिजे या विषयावरती समाजातील विदारक परिस्थितीचे वर्णन करताना स्वतंत्र मॅरेज मॅन्युफॅक्चरिंग ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ची स्थापना करण्याचे आणि राजकीय पक्षांनी प्रत्येक ठिकाणच्या मुलांचे विवाह होतील असे आश्वासन देणारे जाहीरनामे प्रसिद्ध करावेत असे आवाहन केले .
उत्तरार्धामध्ये आहेरा मध्ये इकडून तिकडे फिरणाऱ्या दोन साड्यांची व्यथा, टोपीची कर्म कथा आणि शेतकऱ्यांची विवंचना मांडून शेवटी प्रत्येकाला एक हास्यमंत्र दिला . प्रत्येकाने प्रत्येकाला सांगा की ‘मी मेल्यावर रडू नका मी मेल्यावर हसा हसा ‘.
कार्यक्रमाला काव्य साहित्य वर भरभरून प्रेम करणाऱ्या श्रोत्यांसह नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, डॉ . दिलीप यार्दी, शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाठक आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .
पाहुण्यांचा परिचय धनंजय पांडे यांनी करून दिला . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पं. विश्वनाथ दाशरथे यांनी केले .
कार्यक्रमासाठी दीपक हरकुडे, विकास घोंगटे, प्रा. चित्रा निलंगेकर, श्री व सौ तांदळे, आकाश पांचाळ, तुषार कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले .




No Comment! Be the first one.