लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
नांदेड शहरातील गजबजलेल्या भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी खाजगी शिकवणी समोरील रस्त्यावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तरूणाने खंजीरने सपासप वार करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी घडली आहे. हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर खुनी हल्ल्यामुळे भाग्यनगर परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान सदरील घटना ही एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडली असल्याची चर्चा सुरू आहे.याबाबतीची अधिक माहिती अशी की, राहुल शिवाजी पोहरे यांचे एका अल्पवयीन मुलीला ओळखत होता. सदर मुलगी दुपारी खाजगी शिकवणीसाठी जात असताना त्या मुलीला रस्त्यावर गाठून आपण लग्न करू, तसेच ‘तू मला आवडतेस’ असे म्हणत मुलीला लग्नासाठी गळ घालत होता. सदर मुलीने पोहरे यास लग्नास नकार दिला. त्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सदर मुलगी भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी खाजगी शिकवणी समोर दिसताच रस्त्यावर अभ्युदय बँकेजवळ राहुल पोहरे यांनी तिला गाठले आणि तिच्यावर खंजरने सपासप वार करण्यास सुरुवात केली. सदर मुलीच्या अंगावर तीन वार करुन तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर सदर मुलगी जमीनीवर कोसळली. मुलीवर खंजीरने वार करुन जात असताना भाग्यनगर भागातील नागरिकांनी राहुल पोहरे यास जागेवर पकडून चोप दिला. सदर घटनेची माहिती भाग्यनगर पोलीस पोलिसांना समजताच ते घटनास्थळी धावून आले. नागरीकांनी आरोपी राहुल पोहरे यास पोलिसांच्या ताब्यात दिले. गंभीर जखमी अवस्थेत सदर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिवसाढवळ्या घटलेल्या घटनेमुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कोचिंग क्लासेसच्या परिसरात भरदिवसा तरुणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
No Comment! Be the first one.