शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विभागीय नियंत्रकांना पत्र
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद : वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील भुयारी रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर २०२६ ते २९ मार्च २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी पर्यायी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
याबाबत आमदार बंब यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय नियंत्रकांना पत्र देऊन तातडीने बससेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर–लोणी बोडखा ही दुपारी १२ वाजता बंद असलेली बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर–खुलताबाद–वेरूळ–गल्ले बोरगाव–कन्नड या मार्गावर पाच बसच्या शालेय फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच वडोद कान्होबा शाळेची फेरी बस सध्या फुलंब्री मार्गावर सुरू असून, ही बस खुलताबाद मार्गावरून सुरू ठेवण्यात यावी, अशीही मागणी आमदार बंब यांनी केली आहे.
भुयारी रस्त्याच्या कामामुळे सहा महिन्यांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल होणार असल्याने विद्यार्थी, पालक, स्थानिक नागरिक तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांची दैनंदिन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.