आत्महत्या की मृत्यूमागे अन्य कारण? शिल्लेगाव पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील रायपूर येथील इंदिरा गांधी सैनिकी शाळेच्या वसतिगृहात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने रायपूर परिसरासह शाळेतील विद्यार्थिनी व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिल्लेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सीमा सर्जेराव बंदुके (रा. गडाणा, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सीमा ही रायपूर येथील इंदिरा गांधी सैनिकी शाळेत बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री सीमा हिने सुमारे ९.३० वाजता जेवण केले. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ती झोपण्यासाठी गेली होती. सोमवारी पहाटे वसतिगृहातील विद्यार्थिनींना ती खिडकीच्या गजाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थिनींनी तातडीने याबाबत लेडीज वॉर्डन यांना माहिती दिली. त्यानंतर कमांडर संजय सोनवणे यांना घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांना कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे, बीट अंमलदार विनोद बिघोत आणि रवी कीर्तिकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थिनीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली आहे. विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वसतिगृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षाव्यवस्थेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या वेळी वसतिगृहातील देखरेख व्यवस्था कशी होती, विद्यार्थिनीची अवस्था लक्षात येण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती होती, तसेच घटनेपूर्वी काही अनुचित प्रकार घडला होता का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थिनीचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला की त्यामागे अन्य कोणते कारण आहे, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि पोलिस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार विनोद बिघोत पुढील तपास करीत आहेत.

No Comment! Be the first one.